भविष्यवेधी शिक्षण
भविष्यवेधी शिक्षण
मित्रांनो आपणास माहीतच आहे की,
' विद्यार्थ्यांचा मन मेंदू आणि मनगट यांचा विकास करणे म्हणजे शिक्षण.'
' शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास .'
' विद्यार्थ्यांचा बौद्धिक मानसिक आणि शारीरिक विकास करणे म्हणजे शिक्षण .'
अशा विविध व्याख्या मधून शिक्षण म्हणजे काय आपण पाहीले, ऐकले, वाचले.
परंतु मित्रांनो आपण जन्मलो 19 व्या शतकात ,शिक्षण घेतले विसाव्या शतकासाठीचे आणि आता आपण जगत आहोत एकविसाव्या शतकामध्ये.
मित्रांनो हा काळ काही सोपा नव्हता. आपणा सर्वांनाच माहिती एकोणिसाव्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीने जगामध्ये जलद बदल घडले आणि एकविसाव्या शतकामध्ये आपण बदल स्वीकारून जगत आहोत .
तुम्ही म्हणाल हे आता नवीन काय ?
आपण शिक्षण घेत असताना पाठांतर ,घोकंपट्टी यावर भर दिला जात असे आणि शिकण्याला संस्कारांची जोड देऊन आपले शिक्षण घडले .या संगणक युगात तरीसुद्धा आपण तग धरून उभे आहोत .
मित्रांनो जगात बदल हे प्रत्येक क्षणाक्षणाला खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहे आणि अशा आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या मुलांसाठीचे शिक्षण काय असावे याविषयीचा उहापोह आपण या लेखात वाचणार आहोत.
#22 व्या शतकासाठीचे शिक्षण
मित्रांनो शिक्षण, त्याची पद्धती बदललेली नाही .पूर्वीच्याकाळी शाळांमध्ये घोकंपट्टी करून घेतली जायची, तेव्हा ते गरजेचे होते .कारण माहितीची उपलब्धता कमी होती आणि यात थोड्या तसेच अतिशय संथपणे लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या माहितीवर निर्बंध होते. परंतु आजच्या काळामध्ये तसेच घोकंपट्टी करून शिक्षण दिले जाते आणि मुलांना रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण मिळावं यासाठीची प्रत्येक घरातील आई वडीलांची धडपड असते .
परंतु मित्रांनो पूर्वीचा काळ आणि येणारा काळ यामध्ये हे खूपच अंतर असणार आहे .आपण भविष्यातील काळाचा कोणताही अंदाज लावू शकत नाही .पूर्वी पुस्तकांची उपलब्धता कमी होती ,रेडिओ ,टेलिव्हिजन ,वर्तमानपत्र फारशी मिळत नव्हती. अशा काळामध्ये आपण शिक्षण घेतले.
आज एकविसाव्या शतकामध्ये कोणालाही माहीत नव्हतं की मोबाईल हा माणसाचा एका अवयवासारखेच काम करेल .आज सर्वांच्या हातामध्ये मोबाईल चिकटलेले दिसतो .अशा काळामध्ये सुद्धा आपण तग धरून उभे आहोत.
आणि आपण अपेक्षा करतो की, माझ्या मुलाने त्याला भविष्यामध्ये रोजगार मिळण्यासाठीचे शिक्षण त्याला मिळाले पाहिजे! यामध्ये वाचन-लेखन ,गणिती क्रिया या मुलांना जमल्याच पाहिजेत, परंतु 2020 साली जन्मलेला आपला मुलगा 2050 साली 30 वर्षांचा असेल ! त्यावेळी आजचे रोजगार आहेत , त्या रोजगाराच्या संधी 2050 साली असतील का ? आणि त्यासाठीच शिक्षण आज आपण जे देत आहोत ते त्याला उपयोगी पडेल का ? याचा आपण कधीही विचार केलेला नाही.
आजच आपण पाहिलं तर मोबाईल हातात आल्यामुळे संपूर्ण जग आपल्या हातामध्ये आहे. म्हणजेच विकिपीडिया, गूगल, यूट्यूब ,किंडर ,ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ,फेसबुक, युट्यूब, व्हाट्सअप, ऑडिओ बुक्स ,नेटफ्लिक्स या सर्वांच्या मार्फत माहितीचा महाप्रचंड स्रोत आपल्या खिशात आहे. आज कोणतेही पुस्तक ,कोणतीही माहिती , कोणतेही काम, कोणतेही कौशल्य शिकायचं असेल तर आपण मोबाईलवर पाहून शिकू शकतो ,पाहू शकतो, ऐकू शकतो ,वाचू शकतो अशा काळामध्ये मुलांना पाढे पाठांतर, प्रश्नांची उत्तरे लिहा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार गणिते सोडवा ,धडा मोठ्याने वाचा , इंग्रजी संभाषण शिका या शिक्षण पद्धतीचा वापर केला तर 2050 साली ऐन उमेदीच्या काळामध्ये या शिक्षणाचा काय उपयोग होईल ? याचा आपण कधीही विचार केलेला नाही आणि म्हणूनच एकविसाव्या शतकाच्या मध्यावर आणि 22 व्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन आपली पुढची पिढी आपण कोठे पाहत आहोत याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे .
आज एका क्लिकसरशी अंतराळ आत्ता कोणते संशोधन सुरू आहे हे पाहू शकतो ,अंटार्टिकामध्ये हिमशिखर वितळत आहेत ,शेतीसाठीची अत्याधुनिक अवजारे कशी तयार करावीत हे पाहून शिकू शकतो .याऊलट अश्लील व्हिडिओ पाहणे ,आत्महत्या कशी करावी, फटाके कसे तयार करावेत हेसुद्धा एका क्लिकसरशी मुलांना माहिती मिळते.
अशावेळी महत्त्वाचं ,समाजपयोगी ,मानवी जीवन सुखकर व्हावे यासाठी काय योग्य ? काय अयोग्य ? हे सांगण्यासाठी शिक्षणाचा खूप मोठा हातभार वाटा असणार आहे. यासाठीच शिक्षणाची गरज असणार आहे. एवढ्या प्रचंड माहितीचा अर्थ समजून घेणे ,येणाऱ्या बदलांना सामोरे जाणे, तांत्रिक कौशल्य पेक्षा जीवन कौशल्य आत्मसात करणे ,बदलांना सामोरे जाणे, नवीन गोष्टी शिकणे ,अपरिचित परिस्थितीशी जुळवून घेणे ,मनाचं संतुलन सांभाळणे हे शिकणे खूप गरजेचं असणार आहे . यासाठीच शिक्षण मुलांना दिलं गेलं पाहिजे.
कारण 2050 साला मध्ये जग कसे असेल हे आपण सांगू शकत नाही.
फार पूर्वीपासूनच जीवनाचे दोन भाग आहेत होते. एक होता शिकण्याचा आणि दुसरा होता काम करण्याचा. पहिल्या भागामध्ये आपण जीवनोपयोगी माहिती मिळवली ,कौशल्य शिकून घेतली ,जगाविषयी चा दृष्टिकोण समजून घेतला आणि आपल्या व्यक्तिमत्व घडवलं. जीवनाच्या दुसर्या भागामध्ये काम करण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा जे शिक्षण घेतले त्याचा काम करण्याची असणारा संबंध आपणास समजला नाही किंवा तो तितका उपयोगी पडला नाही.
मात्र 2050 सालामध्ये आपल्या मुलांमध्ये हे कोणती कौशल्य असावीत, या कौशल्यांचा उपयोग त्या सालामध्ये होईल का? फक्त स्वतःला जगण्यासाठीच नव्हे तर समाजाला जगवण्यासाठीचा दृष्टिकोण मुलांमध्ये येणार आहे का ?
आज शिक्षण मिळत आहे ते म्हणजे जे खोल्यांमध्ये तीस-चाळीस मुलं वर्गात बसलेले आहेत . दर तीस मिनिटांनी एक नवीन व्यक्ती- शिक्षक समोर येतात .आपणास मराठी, गणित ,परिसर अभ्यास ,विज्ञान ,इतिहास ,भूगोल या विषयांचे माहिती पुरवतात आणि पुन्हा आपण ती माहिती घेऊन घरी येतो .
मात्र आजच्या काळामध्ये ही संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून मिळत असूनही आपण पूर्वापार चालत आलेल्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार करत आहोत .जर 2050 साली जग कसे असेल हे जर आपणास माहित नसेल आणि आजच्या परिवर्तनाचा वेग पाहिला असता तंत्रज्ञानाने संपूर्ण मानवावर ताबा मिळवलेला आहे .अशा काळामध्ये वन टू थ्री फोर किंवा मराठी हिंदी इंग्रजी या भाषांवर अवलंबून न राहता आजची व उद्याची संपूर्ण जगासाठी वापरली जाणारी संगणकाची भाषा मुलं कशी शिकतील याकडेच आपणास लक्ष द्यावे लागेल.
मित्रांनो आज आपल्याला 2050 साल कस असेल ! याची काही कल्पना नाही !!!
2020 सालामध्ये जन्मलेली मुलं 2050 साली तीस वर्षांची असणार आहेत. या काळामध्ये जग कसे असेल ? लोक जगण्यासाठी कोणती काम करतील ? अत्याधुनिक तंत्रज्ञान कोणती प्रगती झाली असेल ? नोकर्यांच्या कोणत्या संधी असतील ?हे आज सांगता येणार नाही .
जैव अभियांत्रिकीमुळे मानवी देहामध्ये अभूतपूर्व क्रांती होईल आणि मेंदू संगणक यांच्यामध्ये संवाद साधण्याची प्रणाली विकसित झालेले असेल. त्यामुळे आजची मुलं जे शिकत आहेत त्यापैकी बरेचसे शिक्षण 2050 साली निरर्थक ठरेल का? पूर्वी शाळांमध्ये घोकंपट्टी करून घेतली जायची ,आधुनिक शाळा आल्यानंतर प्रत्येक मुलाला वाचन-लेखन शिक्षण मिळालं . विज्ञान इतिहास भूगोल जीवशास्त्र तंत्रज्ञान या विषयांचे पायाभूत तत्व शिकवण्यात येऊ लागली. की खूप मोठी सुधारणा झाली.
मात्र एकविसाव्या शतकामध्ये स्मार्टफोन असेल तर मोफत ऑनलाइन कोर्सेस ,विकिपीडिया वाचणे हे करण्यात सर्वांचं लक्ष गुंतून आहे. यामधून माहितीचा खूप मोठा स्त्रोत सर्वांपर्यंत मोफत पोहोचला आहे .यामध्ये वास्तवाचं भान न राहता एकाकीपणा मध्येच संपूर्ण जगात असल्याचं स्वातंत्र्य एकटेपणात मुल अनुभवताहेत .या सर्व माहितीचे एकत्र तुकडे जोडून संपूर्ण जगाचा सुसंगत चित्र बनवण्यासाठी या पिढीला घडवलं पाहिजे आणि हे भविष्यातील शिक्षण मुलांना स्वतःच्या पायावर निश्चीतच उभे करील .
आत्ताच्या काळामध्ये आपण निर्णय घेऊ त्यातून भविष्यातील जीवन घडणार आहे आणि हे निर्णय आपल्या आजच्या दर्शनावर म्हणजे वास्तवाच्या आकलनावर आधारलेले असणार आहेत. या पिढीकडे जगाचा सर्वसमावेशक दृष्टिकोन नसेल तर भविष्यातील जीवन निरर्थक असेल .
मित्रांनो जैवविज्ञान तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगावर कोरोणाचे संकट पसरलेले आहे. सर्व समाजातील घटक जगण्यासाठी धडपड करत आहेत अशातच शिक्षण हे मात्र दुरूनच घ्यावे लागत आहे. यामध्ये कोणीही कल्पना केली नसेल व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना फक्त आपण ऐकत होतो ,वाचत होतो .मात्र प्रत्यक्षात मुलांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध झाले आणि व्हर्चुअल जगामध्ये मुले रमु लागली .
पुन्हा वास्तव आणि आभासी या दोन विरुद्ध गोष्टी असून वास्तव प्रत्यक्ष शिक्षण घेतले जाते तसे आभासी पद्धतीने फक्त ऐकू आणि पाहू शकतो कृतीमध्ये मात्र आणता येत नाही .आज आपण सर्वच जाहिराती पाहिल्या तर मुलं कोडींग करा शिकायला लागलेत. आपल्या काळामध्ये आपण संगणकाचा वापर सर्वत्र व्हावा यासाठी आपण एक रुपया दररोज देऊन संगणक शिक्षण घेण्यासाठी धडपड करत होतो .मात्र आत्ताच्या मुलांमध्ये संगणक मागे पडून संगणकाची आज्ञावली शिकणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे .
अशा मध्ये मुलं कोडिंग शिकू लागलेले आहेत या काळात जर आपण पुन्हा वाचन-लेखन गणिती क्रिया इतिहास भूगोल विज्ञान यातील तत्त्व शिकत राहिलो तर भविष्यामध्ये मेंदू आणि संगणकाची भाषा मुलांपर्यंत कशी पोहोचेल आणि त्याचा वापर मुलं कशी करतील? म्हणजेच संगणक न शिकलेला मुलगा जसे आपण अडाणी समजत होतो तसेच संगणकाची भाषा न शिकलेला मुलगा हा 2050 साली काय असेल? कारण 2050 सालापर्यंत संगणकाची आज्ञावली माणसांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे लिहिणे एवढा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास झालेला असेल .
मित्रांनो इंग्रजी संभाषण शिकणे हे आज आपण सेमी इंग्रजी इंग्रजी माध्यमांमध्ये मुलं शिक्षणासाठी पाठवून उपयोग होणार नाही. कारण 2050 आली गुगल ट्रान्सलेशन एप जगातील कोणत्याही भाषांमध्ये आपण संवाद साधू शकतो.
मुलांना कोणत्या गोष्टी शिकवले पाहिजेत याविषयी जगभरातील शिक्षण तज्ञ 4 C सांगतात क्रिटिकल थिंकिंग , कम्युनिकेशन, कॉलाबोरेशन आणि क्रिएटिव्हिटी. याचा अर्थ असा की शाळांमध्ये तांत्रिक कौशल्य अपेक्षा सामान्य जीवन कौशल्यांवर भर द्यायला हवे .याचे कारण हेच आहे की परिवर्तनाला सामोरे जाण्याची क्षमता , नवीन गोष्ट शिकणे अपरिचित किंवा अवघड परिस्थितीशी जोडून कसे घेणे , मनाचे संतुलन सांभाळणे ,स्वतःला ओळखणे .
2050 सालाची जुळवून घेताना नवीन संकल्पना, नवीन उत्पादने हे करत असताना स्वतःचा सतत शोध घ्यावा लागणार आहे पुन्हा आभासी जग यामध्ये वास्तविक सर्वजण एकटेच आहोत .आजही घराघरांमध्ये आपण परिस्थिती पाहिली तर घरामध्ये चार सदस्य असतील तर त्यातील तीन सदस्य घरात एकत्र असूनही मोबाईलमध्ये गुंतून पडलेले आहेत .त्यांना प्रत्यक्ष संवाद साधन्यापेक्षा पेक्षा आभासी संवाद साधणे खूप सुखावत आहे.
अशा मध्ये सर्वजण एकटे पडलेले आहेत आणि या एकटेपणाच्या काळामध्ये स्वतःला ओळखणे ,स्वतःतील कौशल्य समजणे, विचार करणे, संपर्क साधने ,परस्परांशी सहयोग करणे आणि सर्जनशीलता या गोष्टींवर मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे .यामध्ये माणसाच माणूसपण हरवलेल आहे.
भारत असो वा अमेरिका असो
जपान असो वा चीन असो
तिथल्या कालबाह्य झालेल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यात अडकून पडलेल्या एका नववीत शिकणाऱ्या मुलाला जर आपण असं म्हटलं की ,तुझी काळजी करणारे तुझ्या घरातील मोठ्या माणसांवर फार अवलंबून राहू नकोस, ते सगळेजण माणूस म्हणून तर चांगले आहेतच, पण त्यांना जग फारसे कळत नाही .
भूतकाळात मोठ्या माणसांवर भरोसा ठेवणे योग्य होतं कारण त्यांना जग चांगला माहीत होतं आणि त्यांना माहीत असलेल्या जगामध्ये बदल ही अतिशय हळूहळू होत होते. परंतु 21 वे शतक हे वेगळेच आहे. या काळात बदलाचा वेग एवढा मोठ्या प्रमाणात होत आहे की घरातील माणसे सुद्धा त्यांनी घेतलेले शिक्षण कालबाह्य ठरत चाललेले आहे. आज मुलं स्वतः स्मार्टफोन अतिशय उत्तम पद्धतीने हाताळत आहेत मात्र आपण शिकलेलो असूनही अजूनही स्मार्टफोन हाताळता येत नाही.
अस असेल तर मग भरोसा ठेवायचा कोणावर ? कशावर ? तंत्रज्ञानावर?
पण तो तर अतिशय मोठा जुगारच ठरेल ! तंत्रज्ञान आपणास सगळ्यांना मदत करते पण मंग आपल्या जीवनावर सत्ता गाजवायला सुद्धा लागते. उद्या असं होईल की कदाचित ते आपणास ओलीस ठेवू शकेल.
हजारो वर्षांपूर्वी माणसाने शेतीचा शोध लावला. मात्र तंत्रज्ञानाने थोड्याच लोकांना त्याचा फायदा झाला आणि असंख्य लोकांना मात्र गुलाम करून ठेवले . तंत्रज्ञान वाईट नाही. जीवनात काय मिळवायचे आहे हे आपल्याला माहिती असायला हवे आणि ते मिळवण्यासाठी तंत्रज्ञान मात्र आपणास आवश्य मदत करू शकतो.
पण जीवनात काय करायचा आहे हेच माहित नसेल तर मात्र आपण ठरलेल्या उद्दिष्टांना आकार देणे आणि आपल्या जीवनावर तंत्रज्ञानाला नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे .तंत्रज्ञानाला माणसं अधिक चांगल्या प्रकारे कळवलेले आहेत. तंत्रज्ञान सेवा करण्याऐवजी आपणच तंत्रज्ञानाच्या हुकुमाचे ताबेदार झाल्याचं लक्षात आलेला आहे . चेहऱ्यांना स्मार्टफोन चिटकलेली माणसे रस्त्यावरून फिरताना आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत .हे तंत्रज्ञानाला नियंत्रण करतात की तंत्रज्ञांन त्यांना नियंत्रित करते, तुम्हाला काय वाटतं ?
मग आपण काय करायचं? स्वतःवर अवलंबून राहायचं की तंत्रज्ञानावर ? आजकाल तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान आणि मशिन लर्निंग कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे संगणक प्रणाली उपलब्ध माहितीच्या आधारे स्वतः शिकत स्वतःमध्ये सुधारणा करत प्रगती करत आहे . लोकांच्या आकांक्षा भावना इच्छा यांवर नियंत्रण मिळवणे सोपे झाले आहे. एकविसाव्या शतकातील अल्गोरिदम....
मित्रांनो आजकाल कोको कोला, गुगल ,ऍमेझॉन हे आपल्या हृदयाच्या तारांशी खेळतात आणि मेंदूतली बटन कशी दाबायची हे स्वतः करु शकलेले आहेत .आपलं मन , शरीर नेमके कसे काम करतात. म्हणजेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन आपल्या शरीराला चिकटलेला असतो. आपल उठणे सुद्धा तोच ठरवतो. आपण अलार्म लावलेला असतो. त्यानंतर सोशल मीडिया वरती आपण काय पोस्ट करतो ,त्या पोस्ट सजेस्ट करणे .
युट्युब वरील आपणास आवडणारे व्हिडिओ दाखवणे . त्यामध्ये मुलं दिवसभर गुंतून पडतात. ते काय पाहतात त्याकडे सुद्धा आपले लक्ष नसतं ! आपल्या हातामध्ये आपण घातलेल्या स्मार्टवॉच आपल्या हृदयाचे ठोके, आपण किती व्यायाम केला आहे यासारख्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहे.
आपणास कोणत्या गोष्टी आवडतात याचा सर्व डाटा गुगलकडे क्षणाक्षणाला जातो आणि गुगल आपणास आवडणाऱ्या गोष्टी दाखवत राहतो .यामध्ये आपण गुंतून पडलेला आहोत .आपली मुलं गुंतून पडलेले आहेत. आपण काय खरेदी करतो कोणत्या गोष्टी ऑनलाईन खरेदी करतो त्यान सारख्याच आपणास आवडणारे इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी सजेस्ट केले जाते आणि आपणास ऑनलाइन खरेदीचा बळीचा बकरा केले जाते.
त्यांना नीट पद्धतीने समजून घेतलं .तरच या गोष्टीतून आपल्याला सुटका करून घेता येणार आहे .आता हे कसं तर आपणा सर्वांनाच माहिती आहे की स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या खिशामध्ये आपल्या शरीरावर ताबा घेण्यासाठी चे यंत्र आहे म्हणजे काय तर प्रत्येक क्षणाला अल्गोरिदम आपल्यावर नजर ठेवून आहे .आपण कुठे गेलो? काय विकत घेतो? कोणाला भेटलो ?कोणती माहिती पाहिली? कोणते व्हिडीओ पाहिले ?आपणास कोणत्या गोष्टी आवडतात? आपले श्वास हृदयाचे ठोके हेच सर्व डाटा अल्गोरिदम आपल्याकडून जाणून घेतलं आणि आपणास त्याच्यासारखेच आपल्यावर नियंत्रण करायला पाहत आहे .
म्हणून या सर्वांमधून आपलं स्वतःचं आकलन अल्गोरिदम न समजता स्वतः स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे एवढ्या मोठ्या वेगाने जग बदलत असताना आपण मात्र चार भिंती मध्ये पाठ्यपुस्तक घेऊन मुलांना काय शिक्षण देत आहोत याचा सर्वांनी विचार करायला हवा.
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा.
टिप्पण्या